बीजिंग – चीनने आपल्या ट्रॅव्हल हेल्थ सर्टिफिकेटची आंतरराष्ट्रीय आवृत्ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीचॅटवर लॉंच केली आहे. हे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र प्रामुख्याने विदेशात असलेल्या चीनी नागरिकांसाठी उपलब्ध असणार असून जगभरातील प्रवासासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग होणार आहे.
सोमवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या वाणिज्य कार्य विभागाने सुरू केलेल्या या प्रमाणपत्रामध्ये न्यूक्लिक ऍसिड चाचणी, सीरम अँटीबॉडी निष्कर्श, रोगप्रतिबंधक लस टोचलेली असणे आणि इतर माहिती समाविष्ट असणार आहे. या ऍपवरील माहितीची पडताळणी करण्यासाठी एक एन्क्रीप्टेड कोडही असणार आहे, अशी माहिती चीनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
भविष्यात अधिकाधिक देश चीनबरोबर आरोग्य प्रमाणपत्रांना परस्पर सामंजस्याने मान्यता देण्यास सहमत असल्याने आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ होऊ शकेल, असे चीनचे राष्ट्रीय समन्वयक आणि परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले. लसीकरण झालेल्या नागरिकांना ल्सीकरण प्रमाणपत्राच्या आधारे विमान प्रवास करू देण्याबाबत चीनने अमेरिकेकडे आग्रह धरला आहे.
चीनमध्ये अलिकडेच करोना विरोधात चार लसींना आपत्कालिन मंजूरी देण्यात आली आहे. आणखी 12 लसींना जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजूरी मिळण्याची प्रतिक्षा आहे. “डब्ल्यूएचओ’ने आतापर्यंत फायझर, मॉडर्ना आणि ऍस्ट्रॅजेनेका लस मंजूर केल्या आहे. याशिवाय भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनसहित भारतीय लसींनाही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास पूर्ववत करण्यात मदत होऊ शकेल.