करोना व्हायरसच्या भीतीमुळे दक्षता
उलांनबातर – मंगोलियाने चीनशी संलग्न असलेली सीमा पुर्णपणे बंद केली आहे. चीन मधून येणाऱ्या वाहनांना तसेच लोकांना तेथे पुर्णपणे प्रवेश बंद करण्यात आला आहे. चीन मध्ये करोना व्हायरसमुळे जो हाहाकार माजवला आहे त्याची लागण आपल्या देशातील नागरीकांना होऊ नये यासाठी त्यांनी ही उपाययोजना केली आहे.
मंगोलियाने आपल्या देशातील सार्वजनिक कार्यक्रमांवर आणि उत्सवांवरही काही काळासाठी बंदी लागू केली असून दक्षतेचा उपाय म्हणून चीन सीमेलगतच्या शाळाही काहीं काळ बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. अजून पर्यंत तरी मंगोलियात या विषाणुचा प्रादुर्भाव झालेला रूग्ण आढळून आलेला नाही.
तथापी मंगोलियाशी संलग्न असलेल्या चीनी हद्दीतील काहीं भागा पर्यंत या विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात आल्यानंतर आमच्या सरकारने ही दक्षतेची उपाययोजना केली आहे असे त्या देशाच्या उपपंतप्रधानांनी म्हटले आहे. मंगोलियातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर 2 मार्च पर्यंत बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.