नगर – नेवासा पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला 45 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. सोपान सदाशिव ढाकणे (वय 34) असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोपान ढाकणे हे नेवासा येथे बालविकास अधिकारी आहेत. बालविकास खात्याकडे भाडेतत्तावर चारचाकी वाहन (कार) लावण्यात आली होती. त्याची कराराची रक्कम 1 लाख 14 हजार रुपये हे तक्रारदार यांना देण्यात येणार होते. या रकमेचा चेक देण्यासाठी ढाकणे यांनी तक्रारदाराकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 45 हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार सापळा रचून एसीबीने ढाकणे यांना लाच स्वीकारताना अटक केली.
ही कारवाई पोलीस निरिक्षक शरद गोर्डे, पोलिस अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हरून शेख, राहुल डोळसे यांनी केली. ढाकणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.