कोल्हापूर – मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत आहेत. तर खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. आता संभाजीराजे नवा पक्ष स्थापन करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संभाजीराजे हे नवीन पक्ष किंवा संघटना स्थापन करून, मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करू शकतात. या लढ्यात ते बहुजन समाजाला एकत्र आणून मराठा आरक्षण लढा नव्याने सुरू करतील असा अंदाज लावण्यात येत आहे. यासाठी सोशल मीडियावर कॅम्पेनही सुरू करण्यात आलं आहे.
दरम्यान संभाजीराजे हे खासदारकीचा राजीनामा देऊन मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करतील. तसेच शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन पुन्हा खासदार पद मिळवू शकतात, असंही राजकीय वर्तुळात बोलल जात आहे. या संदर्भातील भूमिका संभाजीराजे आज पाच वाजता स्पष्ट कऱणार आहे.
संभाजीराजे उद्या प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार असल्याचं समजतं. त्यामुळे संभाजी राजे नवीन पक्ष स्थापन करणार की, महाविकासआघाडीसोबत जाणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.