Aaditya Thackeray – दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काल स्मृतीदिन होता. यानिमित्त सायंकाळी एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरच राडा झाला. दोन्ही गटातील उपस्थित कार्यकर्त्यांमधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले,’शिवाजी पार्क येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे. कारण बाळासाहेबांचा स्मृतीदिन शांततेत साजरा होतो. महाराष्ट्रातून कार्यकर्ते येतात, नतमस्तक होतात आणि आपआपल्या गावी निघून जातात. कोणत्याही परिस्थितीत संघर्ष नको, स्मृतीदिनाला गालबोट लागू नये म्हणून मी, आमदार, खासदार शांतपणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक झालो.
शिंदे पुढे म्हणाले,’दर्शन घेतलं आणि आम्ही निघून गेलो. इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी निघत असताना उबाठाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक राडा करणं, घोषणाबाजी करणं, महिलांना धक्काबुक्की करणं ही बाब अतिशय निंदनीय आहे.’
दरम्यान, शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर दोन्ही शिवसेनांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला. दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये बराच वेळ वादावादी व धक्काबुक्की सुरू होती.