अयोध्या – शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच अयोध्या दौरा करत आहेत. त्यासाठी “चलो अयोध्या’ असा नारा दिल्याने शुक्रवारी (दि. 7 एप्रिल) ठाणे रेल्वे स्थानकातून विशेष अयोध्या ट्रेन सोडण्यात आली होती. त्या ट्रेनमधून दीड हजारांहून अधिक शिवसैनिकांनी जय श्री राम आणि शिवसेनाच्या घोषणा देत अयोध्याकडे कूच केली. एकनाथ शिंदे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा अयोध्या दौऱ्यावर आहेत.
तसेच शिंदे गटातील मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. तसेच यावेळी त्यांनी राम मंदिराच्या निर्माणाची पाहणीही देखील केली. आज मुख्यमंत्री शिंदेंनी अयोध्या दौऱ्यात जोरदार शक्तीपदर्शन केले.
त्यानंतर सायंकाळी एकनाथ शिंदे यांनी महाआरती देखील केली असून, यावेळी आरतीसाठी शरयू नदीच्या तीर फुलांनी सजवण्यात आला होता. महाआरतीनंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. दौऱ्याचे आयोजन करणाऱ्यांचे त्यांनी विशेष करून आभार मानले. यावेळी अयोध्या दौरा यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले.
तसेच ते पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, श्रीरामाच्या आशीर्वादाने आम्हाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळालं. आमच्या कार्यकर्त्यांनी यात्रेचं अत्यंत चांगलं नियोजन केलं. राम मंदिर आणि अयोध्या हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही. विकासाची अनेक कामं याठिकाणी होत आहेत. त्याबबदल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मंदिराचे अतिशय वेगानं काम सुरु असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.