मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये जाऊन आईचे शेवटचे दर्शन घेतले.
त्यानंतर रुग्णवाहिकेमधून पार्थिव स्मशानभूमीमध्ये अंतिमसंस्कारासाठी नेताना मोदींनी रुग्णवाहिकेमधूनच प्रवास केला. रुग्णवाहिकेपर्यंत पार्थिव नेताना मोदींनीच पार्थिवाला खांदा दिला. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भावासोबत मिळून आईच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी रुग्णालयाबाहेर जमली आहे. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. अश्यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींच्या सांत्वनासाठी गुजरातला रवाना होणार आहेत.
विधानसभेचं कामकाज संपल्यानंतर शिंदे अहमदाबादसाठी निघणार आहेत. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे. मात्र, आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनचं त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधान मोदी अतिशय भावुक आणि त्यांचे डोळे पाणावले असल्याचं दिसून आलं.