हनुमंत चिकणे
उरुळी कांचन – मागील सहा महिन्यानंतर प्रथमच चिकनचे दर अडीचशेच्या पार गेले आहेत. गेल्या वर्षी चिकन खाल्यामुळे करोना होतो अशी अफवा पसरली होती. त्यामुळे चिकनचे दर हे साठ ते सत्तर रुपये किलो प्रमाणे होते. सध्या चिकनचे दर गगनाला भिडले आहेत. आवक कमी झाल्यामुळे दरात वाढ झाल्याची माहिती यावेळी विक्रेत्यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे मुंबई व इतर राज्यात जाणारी मालवाहतूक बंद झाली होती. त्यामुळे पोल्ट्रीधारक, शेतकरी, यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर जिवंत कोंबड्याचा माल पडून होता. त्यामुळे बाजारात आवक वाढली आणि चिकनचे दर कमी झाले. पोल्ट्री धारकांनी कमी प्रमाणात कोंबड्यांच्या पिल्लांची खरेदी केली होती. काही दिवसापर्यंत दीडशेच्या आत चिकन तर शंभर रुपयांच्या आत जिवंत कोंबडी विक्री होत होती.
उन्हाळ्यात चिकनचे दर कमी होतात. मात्र यावर्षी उलटे होऊन चिकनचे दर वाढलेले आहेत.
मागील एक दीड महिन्यापूर्वी किरकोळ स्वरूपात चिकन विक्रीचा दर वाढून झाला आहे. येणाऱ्या काही दिवसात आवक सुरळीत झाली नाही तर दर आणखी वाढण्याची शक्यताही विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे चिकनच्या दरात मोठी घट झाली होती. यामुळे पोल्ट्रीचालकांचे कंबरडे मोडले होते. मात्र करोनाकाळात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी चिकन व अंडी खाण्याचा सल्ला दिल्याने मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे चिकनचे दर
वाढलेले आहेत.
उन्हाळ्यात चिकनचे दर कमी होतात हे जरी खरे असले तरी सध्या बाजारामध्ये जिवंत कोंबड्यांची आवक कमी प्रमाणात झाली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रोग प्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी नागरिक चिकन सेवनाकडे वळले आहेत. त्यामुळे चिकनचे दर वाढतच राहतील.
– तबसुम शेख, चिकन विक्रेते उरुळी कांचन
करोनाबाधित रुग्णांना प्रथिनयुक्त) पदार्थ मिळाल्यास त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होते. चिकन, अंडी या माध्यमातून प्रथिने उपलब्ध होतात. हळद व तत्सम पदार्थ ऍन्टिबायोटिक्सचे काम करतात. यामुळे प्रामुख्याने अंडी, चिकन खाणे फायदेशीर ठरते. असंख्य रुग्ण करोनातून बरे झाल्यानंतर हळदीचे दूध घेतात. प्रमाणात प्रोटिन्सयुक्त पदार्थ लाभदायी ठरतात.
– डॉ. सुचेता कदम, वैद्यकीय अधिकारी उरुळी कांचन
चिकनचे सध्याचे दर एका किलोमध्ये
बोनलेस चिकन 280 रुपये
लेग पीस – 260
कटपीस – 100
चिकन – 260
तंदूर – 200
लॉलीपॉप – 260