सातारा – जिल्ह्यात लंपी स्किनमुळे शुक्रवारी जिल्ह्यात 7 जनावरांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर वगळता 10 तालुक्यांतील 131 गावांमध्ये लंपी स्किन आजाराची लागण झाली आहे.
आजअखेर 2672 गाई व 331 बैल अशा 3003 जनावरांस प्रादुर्भाव झाला आहे. आज अखेर 201 पशुधन मृत झाले आहे. 769 जनावरे नियमित औषध उपचाराने बरी झालेली आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
लंपी स्कीन उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यक औषधे, शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकीत्सालायांमध्ये उपलब्ध आहेत. जिल्हयातील गोवर्गीय पशुधनाची संख्या 3 लाख 52 हजार 436 असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आजअखेर बाधित गाव व बाधित गावाच्या 5 किलोमीटर परिघातील एकूण 782 गावांमधील गोवर्गीय 1 लाख 96 हजार 186 व इतर अबाधित क्षेत्रातील गावांमधील गोवर्गीय 1 लाख 50 हजार 914 असे एकूण 3 लाख 47 हजार 100 पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात आल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.