नवी दिल्ली – आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आणि देशात विरोधकांची एकजुटीने मूठ बांधण्यासाठी काँग्रेस पक्षाला पूर्ण वेळ सक्रिय अध्यक्ष हवा अशी अनेक काँग्रेस नेते मागणी करत आहेत. त्यातच राजस्थानपाठोपाठ आता छत्तीसगड काँग्रेसनेही राहुल गांधींना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर केला आहे. रविवारी झालेल्या छत्तीसगड काँग्रेसच्या प्रतिनिधींच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
यानंतर माहिती देताना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, हा प्रस्ताव दोन राज्यांमध्ये मंजूर करण्यात आला आहे. इतर राज्यांतूनही हा प्रस्ताव आल्यास राहुलजींनी या प्रकरणाचा फेरविचार करावा. तब्बल 21 वर्षांनंतर काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी निवडणूक होत आहे. यासाठी जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 24 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार, हे 19 ऑक्टोबरला निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इतर राज्यांमध्ये देखील राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठीचे प्रस्ताव आणले जाणार असलायची सध्या चर्चा आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज रविवारी 11 वा दिवस आहे. याबाबत राहुल गांधी केरळमध्ये ठिकठिकाणी जाऊन जनतेला पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहेत.