मुंबई – रॉबिन उथप्पा, शिवम दुबे व मोईन अली यांनी केलेल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) आयपीएल स्पर्धेत गुरुवारच्या लढतीत लखनौ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी 211 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
लखनौचा कर्मधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकत चेन्नईला प्रथम फलंदाजी दिली. या सामन्यातही सलामीवीर ऋतूराज गायकवाड अपयशी ठरला. अनावश्यक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो 4 चेंडूत 1 धाव काढून बाद झाला. त्यानंतर उथप्पाने मोईन अलीसह अर्धशतकी भागीदारी केली. त्याचवेळी अर्धशतक फटकावलेला उथप्पा बाद झाला. त्याने आपल्या 50 धावांच्या खेळीत 27 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार व 1 षटकार अशी फटकेबाजी केली.
व्हिसाच्या प्रश्न सुटल्यामुळे भारतात दाखल झालेल्या मोईन अलीने विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करत या सामन्यासाठी संघात पूनरागमन केले. तो चांगला खेळत असतानाच आवेश खानच्या चेंडूवर त्रिफळाबाद झाला. त्याने संघाला शतकी धावसंख्या गाठून देताना 35 धावांच्या खेळीत 22 चेंडूत 4 चौकार व 2 षटकार फटकावले. त्यानंतर शिवम दुबेने अंबाती रायडूला हाताशी घेत अर्धशतकी भागीदारी करताना आक्रमक फलंदाजी केली.
रायडू 27 धावांवर परतला. त्याने 20 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार फटकावले. दुबे मात्र, अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. तो 30 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 49 धावा करून बाद झाला. कर्णधार रवींद्र जडेजाने 3 चौकारांसह 9 चेंडूत आक्रमक 17 धावांची खेळी केली व माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह संघाचे द्विशतक फलकावर लावले. धोनीने नाबाद 16 धावा करताना 6 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार मारला. चेन्नईने 20 षटकांत 7 गडी गमावून 210 धावा उभारल्या. लखनौकडून रवी बिष्णोई, ऍण्ड्रयु टाय व आवेश खान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 7 बाद 210 धावा. (रॉबिन उथप्पा 50, शिवम दुबे 49, मोईन अली 35, आंबाती रायडू 27, रवींद्र जडेजा 17, महेंद्रसिंह धोनी नाबाद 16, रवी बिष्णोई 2-24, आवेश खान 2-38, ऍण्ड्रयु टाय 2-40).