अवसरी – ड्रोनवर आधारित वैद्यकीय आवश्यक वस्तूंच्या वितरणासाठी एंड- टू-एंड तंत्रज्ञान उपाय महत्त्व पूर्ण ठरणार आहे. यूके आणि भारत एका नवीन तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मच्या चाचण्या घेण्यासाठी एकत्र आले आहेत. जे एकाच ड्रोन फ्लाइटमध्ये कोल्ड चेन राखून वैद्यकीय जीवनावश्यक वस्तूंचे अनेक वितरण सक्षमपणे करते.
शेवटच्या घटकापर्यंत वैद्यकीय औषधे आणि वस्तूचे वितरण करण्यासाठी ते ड्रोनद्वारे पोहचवण्याचे तंत्रज्ञान आगामी काळात उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुंबईतील ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाच्या उपप्रमुख कॅथरिन बार्न्स यांनी केले.
अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे आणि वैद्यकीय वस्तूंचे वितरण करण्यासाठी ड्रोनद्वारे पोहचवण्याचे तंत्रज्ञानाची प्रात्याक्षिक घेण्यात आले, यावेळी बार्न्स बोलत होत्या. व्होलार अल्टा ने, केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या भागीदारीत आणि यूके सरकारच्या पाठिंब्याने संजीवन भारत प्रोग्राम लॉंच केला आहे.
यावेळी डॉ. संजय जुवेकर, निहारिका कोलते आळेकर, डॉ. मोहन गुप्त, डॉ. धीरज अग्रवाल, मुंबईतील ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाच्या उपप्रमुख कॅथरिन बार्न्स, डॉ. रुतुजा पाटील, डॉ. गिरीश दायमा, डॉ. मकरंद घोरपडे, शिरीष कथले, आंबेगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, जुन्नर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुंजाळ, सरपंच जगदीश अभंग, उपसरपंच स्नेहा टेमकर, सरपंच निरगुडसर ऊर्मिला वळसे, तसेच परिसरातील विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी ,ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी कॅथरीन बार्न्स म्हणाल्या, ड्रोन तंत्रज्ञानाने महत्त्वाचे वैद्यकीय साहित्य, औषधे पुरवठा करण्याच्या क्षमतेमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. लाखो लोकांचे जीवन सुधारण्याची आणि वाचवण्याची क्षमता या पुरवठा यंत्रणेमुळे शक्य होणार आहे.
या यंत्रणेत एरोस्पेस-ग्रेड अल्युमिनियम मिश्र धातुपासून बनवलेले, हलके-वजनाचे कंटेनर,सक्षम लॉकिंग यंत्रणा असून आणि आईसपॅकशिवाय कोल्ड-चेनची देखभाल करण्यासाठी सज्ज आहे. कोल्ड-चेन आणि नियमित वैद्यकीय जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त विविध अवयवांची वाहतूक करण्यास सक्षम असणार आहे.
ऑन-डिमांड लॉजिस्टिक नेटवर्कची स्थापना
या ऑपरेटिंग मॉडेलमुळे इतर खर्चात बचत होणार आहे. वैद्यकीय वाहतूक करण्यासाठी ऑन-डिमांड लॉजिस्टिक नेटवर्कची स्थापना करून संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक गोष्टीची या माध्यमातून तयारी करण्यात येत आहे. ड्रोन-आधारित वितरण हे आपत्कालीन परिस्थितीत तसेच नियमित पणे उपयुक्त ठरू शकते.
“विविध कंपन्या दुर्गम भागात क्लिनिकल चाचण्या घेत आहेत, वेगवेगळ्या सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या आणि क्षमतेचे ड्रोन एका समान प्लॅटफॉर्मवर आरोग्यसेवा आणि अन्न वितरण प्रणालींच्या गरजा पूर्ण करता येणार आहे.”
-निहारिका कोलते-आळेकर, सीईओ, अल्ट्रा प्रायव्हेट लिमिटेड
“भारतातील अनेक एजन्सींद्वारे वैद्यकीय अत्यावश्यक वस्तूंच्या वितरणासाठी ड्रोनचे प्रात्यक्षिक केले गेले आहे. उपलब्ध तंत्रज्ञानात दिवसेंदिवस आमूलाग्र बदल होत आहेत. तंत्रज्ञानाची अंमलबजावणी उपयुक्ततेचे मोजमाप यावर काम करत आहे.”
-रुतुजा पाटील, शास्त्रज्ञ, एचआरसी केईएम, पुणे