सहकारनगर – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण परिसराच्या पाणलोट क्षेत्रात मुदतबाह्य झालेली औषधे व इंजेक्शनचा साठा मोठ्या प्रमाणात सापडला. याच धरणांतून पुणे शहरातील कमीत कमी 50 लाख नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे धरणांतील पाणी दूषित झाले आहे की नाही? याची तपासणी करणे गरजेचे ठरत असून या प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी यासंदर्भातील अहवाल तयार करावा आणि त्यानंतरच शहरात पाणी सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस अर्बन सेलकडून करण्यात आली आहे).
पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये पाणी पुरवठा करणारे जेवढे जलशुद्धीकरण केंद्रे आहेत, तेथे पाणी पोहोचण्या अगोदर आणि शुद्धीकरण झाल्यानंतर नागरिकांना पाणी सोडण्यापूर्वी कोण कोणत्या प्रकारची तपासणी होते. खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात वरील भाग व गावांमधून जे सांडपाणी व मलमूत्र मिसळले जाते, याबाबत आपण काय कार्यवाही केली, तसेच संबंधीत ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी अर्बन सेलद्वारे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. यावेळी स्वप्निल खडके, संजय दामोदरे, अमोल परदेशी, राकेश बैईकर, रोहन पवार आदी उपस्थित होते.