सात प्राचीन, जागृत देवस्थानात भाविकांची गर्दी : धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) गावाला दैवतांची अर्धी काशी म्हणून ओळख आहे. गावात अनेक जागृत मंदिरे आहेत. नवरात्र उत्सवानिमित्त गावात सात प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या दुर्गामाता मंदिर दुर्गाआळी, फिरंगाई माता मंदिर मातंग वस्ती, लक्ष्मीआई मंदिर जगताप वस्ती नजीक, महालक्ष्मी मंदिर वडार आळी, अंबाबाई मंदिर पांडुरंग आळी, तुकाईमाता मंदिर शहामळा, काळूबाई मंदिर चिमणापीर मळा या सर्व मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी नैव्यद्य दाखविण्यासाठी गर्दी होत आहे.
दसऱ्याची पालखी या मंदिरात येतात. दसऱ्याची पोत मंदिरांमधून पाजळली जाते. यानंतर गावात पोतसोहळा सुरु होतो.
नवरात्रीची सातवी माळ म्हणजेच सातवा दिवस आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्री देवीची पूजा केली जाते. नवदुर्गामध्ये माता कालरात्री देवी ही सातवी दुर्गा मानली जाते.
कालरात्री देवीच्या शरीराचा रंग अंधाऱ्या रात्रीप्रमाणे काळा, डोक्यावरील केस विखुरलेले आणि गळ्यात चमकणारी माळ आहे. म्हणून या देवीला कालरात्री म्हणतात. या देवीच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा निघतात. चतुर्भुज देवीचे वाहन गाढव असते.
उजव्या एका हाताची अभय व दुसऱ्याची वरमुद्रा आहे. एका डाव्या हातात लोखंडाचा काटा व दुसऱ्या हातात तलवार आहे. उग्र स्वरूप असूनही शुभ फळ देणाऱ्या या देवीला शुभंकरी म्हणतात. सप्तमी तिथीला कालरात्री देवीला पूजा केल्याने शनीचे अशुभ प्रभाव टळतात. सर्व सिद्धी प्राप्त होते.