इस्लामाबाद – पाकिस्तानातील भीषण पूरामध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या आता एक हजाराच्यापुढे गेली आहे. तर जखमी आणि बेपत्ता होणाऱ्यांची संख्याही जून महिन्यापासून आतापर्यंत एक हजाराच्या पुढे गेली आहे. पाकिस्तानातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ही माहिती दिली.
गेल्या 24 तासात 119 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 71 जण जखमी झाले आहेत. यातील बलुचिस्तानात 4, गिलगीट बाल्टिस्तानात 6, खैबर पख्तुन्वा प्रांतात 31 आणि सिंध प्रांतात 76 जण मरण पावले आहेत. मृतांची एकूण संख्या आता 1,033 इतकी झाली आहे, असे आपत्ती व्यवस्तापन प्राधिकरणाने म्हटले आहे.
पाकिस्तानात (Pakistan) यावर्षी 14 जून पासून 3,451 किलोमीटरचे रस्ते वाहून गेले आहेत आणि 149 पूल कोसळले आहेत. तर 170 दुकाने नष्ट झाली आहेत. एकूण 9 लाख 49 हजार घरे अंशतः किंवा पूर्णपणे कोसळली आहेत. तर 7 लाख 19 हजार जनावरे पूरामध्ये मारली गेली आहेत.
पाकिस्तानातील 110 जिल्ह्यांना पूराचा फटका बसला आहे. त्यातील 72 जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. पूराचा फटका 57 लाख लोकांना बसला आहे, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. मात्र ही सरकारी आकडेवारी आहे. प्रत्यक्ष्यात 3 कोटी 30 लाख लोकांना पूराचा फटका बसला आहे. 51 हजार जणांना वाचवले गेले असून 4 लाख 98 हजार जणांना आश्रय छावण्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
पाकिस्तानातील पावसाचा जोर अजूनही सुरूच आहे. खैबर पख्तुन्वा प्रांतातील नौशेरा भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे काबूरल नदीला जास्त ते अतिजास्त स्वरुपाचा पूर येण्याची शक्यता पूर नियंत्रण विभागाने म्हटले आहे. (Chaos in Pakistan! The death toll in the flood is close to a thousand)