मुंबई – शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर पक्षात पुनर्बांधणी सुरू करण्यात आली आहे. पक्षात रिक्त असलेल्या कार्यकारिणीत अनेकांना स्थान देऊन त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.शिवसेनेसोबत निष्ठा राखणाऱ्या खासदार अरविंद सावंत आणि आमदार भास्कर जाधव यांना पक्षाच्या नेतेपदी वर्णी लावण्यात आली आहे. तर, पराग डाके यांना सचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे.
ही माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांना पक्षनेतेपद होते. तसेच, त्यांच्यासोबत गेलेल्या अनेक आमदार आणि खासदार शिवेसनेच्या महत्त्वाच्या पदावर नियुक्त होते. मात्र, बंडाळी झाल्यानंतर अनेक पद रिकामे झाली आहेत.
या जागांवर आता पक्षातील इतर कार्यकर्त्यांना संधी मिळत आहे. त्यानुसार, पक्षनेते पदी अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सचिवपदी पराग डाके यांना नियुक्त करण्यात आले. आक्रमक स्वभाव म्हणून ओळखले जाणारे भास्कर जाधव गेल्या काही दिवसांपासून प्रचंड सक्रिय आहेत.
शिंदे गटाविरोधात त्यांनी रान उठवले आहे. विधानसभेतही त्यांनी शिवसेनेची बाजू लावून धरली होती. तर, अरविंद सावंत यांनीही संसदेत सत्ताधाऱ्यांविरोधात हल्लाबोल केला आहे. त्यामुळे शिवसेनेने या दोन्ही नेत्यांना बढती देण्यात आली आहे. (Reconstruction of Shiv Sena! Arvind Sawant, Bhaskar Jadhav as party leader and Parag Dake as secretary)