पुणे – पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत अद्याप अपराजित राहिलेल्या ओडिशा जगरनट्स संघाने सलग पाचव्या विजयाची सनसनाटी कामगिरी नोंदवताना प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याची शानदार कामगिरी केली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मिलिंद चावरेकर (3 मिनिटे 13 सेकंद व 5 गुण) च्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ओडिशा जगरनट्स संघाने मुंबई खिलाडीज संघाचा 60-37 असा 23 गुणांच्या फरकाने एकतर्फी विजय मिळवला. सूरज लांडे यानेही 12 गुणांची नोंद करताना विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली.
त्याआधी गेल्या दोन सामन्यांत विजय मिळवणाऱ्या मुंबई संघाने पहिल्या सात मिनिटांत 16 गुण मिळवताना ओडिशावर 16-08 अशी आघाडी घेतली. मात्र, ओडिशा जगरनाट्सच्या आक्रमकांनी दुसऱ्या सत्रातील केवळ दोनच मिनिटांत ही आघाडी तोडत आपल्या संघाला पहिल्या डावाअखेर 29-20 अशी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रात मिलिंद चावरेकरने 3 मिनिटे 13 सेकंद संरक्षण करताना ओडिशाला 4 बोनस गुण मिळवून दिले, तर दिनेश नाईकने 2 मिनिटे 34 सेकंद धाव घेताना आणखी 2 बोनस गुणांची भर घातली. त्यामुळे तिसऱ्या सत्राअखेर मुंबईकडे केवळ 2 गुणांची आघाडी राहिली. हे वर्चस्व न गमावता ओडिशा संघाने अखेरच्या सत्रातही वेगवान खेळ करत 60-37 अशा दणदणीत विजयाची नोंद केली. ओडिशाने एकूण 18 गुणांसह गुण तालिकेत अग्रस्थानी झेप घेतली. मुंबईकडून श्रीजेश याने सात गुण मिळवून कडवी झुंज दिली. ओडिशाबरोबर गुजरात जायंट्स संघानेही प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे.