पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगत्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पुणे शहरातून 12 आणि 13 जूनला होणार आहे. या दिवशी होणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. त्याचे सुधारित वेळापत्रक लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.तसेच दि. 14 ते 16 जूनदरम्यान पालखीचे प्रस्थान सासवड परिसरातून होणार असल्याने या कारणास्तव परीक्षा देता न येणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
मात्र, विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांनी केलेल्या मागणीनुसार पालखीचे प्रस्थान पुणे शहरातून 12 आणि 13 जूनला होणार असल्याने या दिवशीच्या परीक्षांचे फेरनियोजन करण्याची गरज आहे. त्यामुळे पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयातील 12 आणि 13 जूनला होणाऱ्या परीक्षांचे फेरनियोजन केले जाणार आहे.
विशेष परीक्षेसाठीच्या अर्जासाठी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज सादर करावेत. कोणत्याही कारणांमुळे विशेष परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने महाविद्यालयांना केल्या आहेत.