विक्री कर रद्द होणार?
नवी दिल्ली, दि. 9 – विक्री कर म्हणजे भ्रष्टाचाराचे एक मोठे उगमस्थान असून तो रद्द करण्याबाबत जनता सरकार विचार करीत आहे, असे रेल्वे मंत्री मधू दंडवते यांनी सांगितले. साडेसहा एकरांपर्यंतच्या जमिनीवरील महसूलही रद्द केला जाईल, असे ते म्हणाले. मतदानाच्या अधिकारासाठी असलेली किमान वयोमर्यादा 21 वरून 18 वर आणण्याबाबतही विचार चालू आहे, असे ते म्हणाले. रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाने प्रवास करणाऱ्यांना अधिक सोयी पुरविल्या जातील, असे त्यांनी सांगितले. यासोबतच आगामी कल्याणकारी योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली.
टीव्हीवर चित्रपट दाखविणे चालू राहणार
नवी दिल्ली – दूर चित्रवाणीवर चित्रपट दाखविणे बंद करण्यात येणार आहे, अशी अफवा निराधार आहे, असा खुलासा माहिती व नभोवाणी अधिकाऱ्यांनी केला आहे. नभोवाणी मंत्री आडवाणी यांनी जयपूर येथे बोलताना असे मत व्यक्त केले होते की, दूरदर्शनवर चित्रपट दाखवून लोकप्रियता मिळविण्यापेक्षा आपले स्वतंत्र कार्यक्रम लोकप्रिय करावेत. त्यावरून काही दैनिकांनी वरील वार्ता प्रसूत केली होती. त्यामुळे टीव्हीवर चित्रपट दाखविणे बंद होणार अशी अफवा पसरली होती.