पिंपरी, दि. 9 – पिंपरी येथील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे चौथ्या टप्प्यातील काम सुरू करण्यात आले आहे. पुलाचे काम सुरू असताना पुलावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. उड्डाणपुलावरून चार बाजूंनी वाहतूक होते. प्रत्येक बाजूचे स्वतंत्रपणे दुरुस्तीचे काम केले जात आहे. त्या दरम्यान वाहतुकीत बदल केले जात आहेत. उड्डाणपुलावरून भाटनगरकडे जाणाऱ्या मार्गाची डागडुजी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
वाहतुकीत बदल खालीलप्रमाणे –
पिंपरी पुलावरुन भाटनगरकडे जाणारी वाहतूक गोकुळ हॉटेल- शगुनचौक- कराची चौक- रिव्हर रोड- भाटनगर चौकाकडून पुढे लिंकरोडकडे जाईल.
भाटनगरकडून पिंपरी पुलाकडे जाणारी वाहतूक भाटनगर – रिव्हर रोड – कराची चौक शगुन चौक – पिंपरी पूल – क्रोमा शोरुम – मोरवाडी चौक अशी जाईल.
पिंपरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामा दरम्यान पहिल्या टप्प्यातील भाटनगर बाजू कडील काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक रिव्हर रोड – शगुन चौक मार्गे राहील. काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे स्पॅन वरील एका बाजूने दुहेरी वाहतूक चालू ठेवण्यात येईल.
पिंपरी गावामध्ये पिंपरी चौक व अहिल्यादेवी चौकाकडून पिंपरी पुलावरुन येणाऱ्या पीएमपीएमएलच्या बसेस एम्पायर इस्टेट काळेवाडी मार्गे वळविण्यात येत आहे.
अवजड वाहनांना डेअरी फार्म रोड मार्गे, डिलक्स चौक तसेच भाटनगर मार्गे सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे