नवी दिल्ली – भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेतून चंद्रावर पाठवलेल्या प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावरील दक्षिण ध्रुवावर सल्फर असल्याचा निर्वाळा दिला आहे. भारतीय अंतराळ संस्था अर्थात “इस्रो’चे हे मोठे यश मानले जाते आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फरशिवाय इतर धातू आणि ऑक्सिजनचे प्रमाण आढळले आहेत. “इस्रो’कडून आता हायड्रोजनचा शोध सुरू आहे.
“इन-सीटू’ मापनाद्वारे रोव्हरवरील ‘लेझर-इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप’ या उपकरणाने प्रथमच दक्षिण ध्रुवावर सल्फर स्पष्टपणे शोधले आहे. ऍल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टिटॅनियम, मॅन्गेनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजनचा शोध आतापर्यंत लागला आहे. दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात धातू असल्याचे आढळून आले आहे. “एलआयबीएस’नावाचा हा पेलोड बेंगळुरू येथील “इस्रो’ च्या इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम्स प्रयोगशाळेत विकसित केला गेला आहे.