अमरावती – मंदिरात देव-देवतांच्या दर्शनासाठी गेल्यानंतर अनेकजण दान स्वरूपात दान पेटीत काही रक्कम टाकतात. ठराविक दिवशी किंवा दररोज सायंकाळी ही रक्कम मंदिर प्रशासनाकडून मोजली जाते.
आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणममधील सिम्हाचलच्या श्रीवराह लक्ष्मी मंदिराच्या दानपेटीत एका भाविकाने चक्क 100 कोटी रुपयांचा चेक टाकल्याचे आढळून आले. एवढी मोठी रक्कम पाहताच मंदिर प्रशासनामध्ये आनंदी-आनंद झाला. मात्र तो चेक वठवण्यासाठी मंदिर समितीचे अधिकारी जेव्हा बॅंकेत गेले तेव्हा त्या खात्यावर केवळ 17 रुपये आढळून आले. या चेकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दानपेटीत टाकलेला तो चेक कोटक महिंद्रा बॅंकेचा होता. या प्रकरणाबाबत मंदिर व्यवस्थापनाने कोणतीही तक्रार दाखल केली नाही. कोणीतरी मस्करी म्हणून हा धनादेश मंदिरातील दानपेटीत टाकल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या धनादेशाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ‘देवाला तरी घाबरा’ अशा कमेंट केल्या जात आहेत.