चांद्रयान 2 यशस्वीपणे मार्गस्थ

*अपेक्षेपेक्षा चांगले प्रक्षेपण झाल्याचा इस्त्रोचा दावा
*यशस्वी प्रक्षेपणानंतर वैज्ञानिक व तंत्रज्ञांनी केला जल्लोष

श्रीहरीकोटा- भारताने आज प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या मोहीमेत पहिले यशस्वी पाउल टाकले. चांद्रयान 2 चे प्रक्षेपण आज येथील प्रक्षेपणस्थळावरून नियोजनबद्धरित्या झाले. त्यावेळी जीएसएलवी- एमके 3- एम1 या रॉकेटद्वारे चांद्रयान 2 अवकाशात नियोजित वेळेत प्रक्षेपित करण्यात आले. दुपारी 2 वाजून 43 मिनीटांनी हे प्रक्षेपण झाल्यानंतर सोळाच मिनीटांमध्ये हे यान पृथ्वीच्या आपल्या नियोजित कक्षेत पोहचले.त्यावेळी इस्त्रोच्या तंत्रज्ञ आणि वैज्ञानिकांनी नियंत्रण कक्षात एकच जल्लोष केला.

ही मोहीम यशस्वी झाल्याने इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी समाधान व्यक्त केले. या आधी 15 जुलै रोजी होणारे प्रक्षेपण तांत्रिक बिघाडामुळे रद्द करावे लागले होते. त्यामुळे आजच्या प्रक्षेपणाचा थोडा तणाव वैज्ञानिकांवर होंता. भारताची ही मोहीम 978 कोटी रूपये खर्चाची आहे. भारताचे यान चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरणार असून तेथे ते काही प्रयोग करणार आहे. इस्त्रोचे प्रमुख के सिवन हे आज प्रत्यक्ष जातीने या उड्डाणाच्या प्रत्येक स्थितीवर लक्ष ठेऊन होते. अपेक्षेप्रमाणे हे प्रक्षेपण झाल्यानंतर सिवन हे भारावून गेलेले दिसले. आपली पहिली प्रतिक्रीया नोंदवताना ते म्हणाले की भारताचा चंद्राच्या दिशेने आता प्रवास सुरू झाला आहे. आधीच्या अपयशानंतर आम्ही नव्या उमेदीने पुन्हा परतलो आहोत. या पुढील दीड महिन्याच्या काळात 15 महत्वाचे तांत्रिक व्यवहार आम्हाला हाताळायचे आहेत. आपले यान प्रत्यक्ष चंद्रावर उतरण्याची प्रक्रियाही थरारक असेल. हे यान चंद्राजवळ पोहोचल्यानंतर प्रत्यक्ष यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा पंधरा मिनीटांचा हा प्रयोग यातील महत्वाचा टप्पा असेल असे ते म्हणाले.

इस्त्रोने या आधी अकरा वर्षांपुर्वी चांद्रयान 1 ही मोहीम यशस्वीपणे पुर्ण केली होती. त्यावेळी भारताने सोडलेल्या यानाने च्रंद्राच्या अगदी जवळच्या कक्षेत जाऊन 3400 फेऱ्या पुर्ण केल्या होत्या व ते यान तेथे 312 इतके दिवस कार्यरत होते. 29 ऑगस्ट 2009 पर्यंत ते तेथे कार्यरत होते. आज अवकाशात प्रक्षेपित करण्यात आलेले यान सप्टेंबर महिन्यात प्रत्यक्ष चंद्राच्या भूमीत पोहचणे अपेक्षित आहे. तो प्रयोग यशस्वी झाला तर प्रत्यक्ष चंद्राच्या भूमीवर पोहचणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. या आधी रशिया, अमेरिका आणि चीन यांनी चंद्रावर यशस्वी स्वारी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)