#Prokabaddi2019 : ‘सुपरटेन’ कामगिरी सुखकारक – राहुल चौधरी

हैदराबाद – तमीळ थलाईवाज संघाकडून खेळताना पहिल्याच सामन्यात “सुपरटेन’ कामगिरी केल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. यापुढेही अशीच कामगिरी करीत आमच्या संघास विजेतेपद मिळविण्याची जबाबदारी मी निश्‍चितपणे पार पाडीन असे या संघाचा चढाईपटू राहुल चौधरी याने सांगितले.

थलाईवाजने येथे तेलुगु टायटन्स संघावर 39-26 अशी मात केली. या सामन्यात चौधरी याने 12 गुणांची कमाई केली. मनप्रित चिल्लरने 6 गुण नोंदवित त्याला चांगली साथ दिली. चौधरी याने यापूर्वी तेलुगु संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तेलुगु संघाविरूद्ध खेळताना दडपण आले होते काय असे विचारले असता तो म्हणाला, माझ्या खेळाचा तेलुगुच्या खेळाडूंना भरपूर अभ्यास आहे. तरीही प्रत्येक सामन्यात विविधता आणण्याची मला सवय आहे. त्यामुळे जरी त्यांनी माझ्याकडून कशा चुका होतील यावर लक्ष दिले होते, तरीही मी अधिकाधिक आक्रमक खेळ करण्यावर भर दिला. सुदैवाने माझ्या चढाया अपेक्षेप्रमाणे प्रभावी ठरल्या.

सुपरटेनविषयी चौधरीने पुढे सांगितले की, मी कधीही वैयक्तिक ध्येये साध्य करण्यासाठी खेळत नाही. संघास विजय मिळवून देण्यास मी सर्वोच्च प्राधान्य देतो. येथेही संघास विजय मिळविण्याच्या वाटचालीत सुपरटेन कामगिरी झाली हा केवळ योगायोग आहे. आता कुठे या स्पर्धेस सुरूवात झाली आहे. अजून भरपूर सामने मला खेळावयाचे आहेत.

थलाईवाज संघाचा कर्णधार अजय ठाकूर म्हणाला, ‘राहुल हा आमच्यासाठी अत्यंत मौल्यवान खजिना आहे. पहिल्याच सामन्यात त्याने त्याच्या नावलौकिकास साजेशी कामगिरी करीत झकास सलामी केली आहे. त्याच्याकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत. तेलुगु संघाकडे युवा खेळाडूंचा भरणा असला तरी आम्ही त्याचे कोणतेही दडपण घेतले नव्हते. आमच्याकडे अनुभवी व युवा खेळाडूंचा योग्य समतोल साधला गेला आहे. त्यामुळेच आम्ही हा सामना जिंकू शकलो’.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)