इस्लामपूर – येथील लोकराज्य विद्या फौंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर तांदळे यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई यांच्यावतीने यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक युवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल अत्यंत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार आहे.
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कार्यरत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यातील नियोजित कार्यक्रम रद्द करुन पोस्टाद्वारे सन्मानपत्र, रोख रक्कम २१ हजार रुपयेचा चेक पाठवून युवा सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर तांदळे यांना सन्मानित केले.
चंद्रशेखर तांदळे यांनी राज्यातील एक हजार १११ स्मशानभूमी स्वच्छतेचा संकल्प केला आहे. सांगली,सातारा,कोल्हापूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील विविध डोंगरी,दुर्गम,ग्रामीण व शहरी भागातील ३४९ स्मशानभूमीची त्यांनी स्वच्छता केली आहे. स्मशानभूमीत विविध समाजजागृती आणि समाज प्रबोधनाचे उपक्रम तांदळे सातत्याने राबवित आहेत. आरोग्य शिबिरे,व्यसनमुक्ती शिबिर,अंधश्रद्धा निर्मूलन ,कन्या वाचवा अभियान, युवा संवाद, महिला-बालक- पालक मेळावा यासारखे विविध उपक्रम तांदळे यांनी समाजात सातत्याने राबविले आहेत.स्मशानभूमी स्वच्छता आणि प्रबोधन अभियान सातत्याने गेल्या चार वर्षापासून त्यांनी संपूर्ण राज्यभर सुरू ठेवले आहे.
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन चंद्रशेखर तांदळे यांना लाभत आहे.
माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत,माजी खासदार धनंजय महाडिक,माजी आमदार भगवानराव साळुंखे, महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सचिव सरोजमाई पाटील,माजी नगराध्यक्ष ॲड.राजेन्द्र ऊर्फ चिमण डांगे,भाजपा युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष राहुल महाडिक, हुतात्मा दुध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी,सम्राट महाडिक,राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे, राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश महिला सरचिटणीस ॲड.मनिषा रोटे, तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील,शिवाजी पवार,कपिल ओसवाल,सरोजिनी कदम आदींनी चंद्रशेखर तांदळे यांचे अभिनंदन केले असुन त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुरस्काराची रक्कम स्मारकाला
तांदळे यांनी पुरस्काराची मिळालेली २१ हजार रुपयेची रक्कम शिक्षणमहर्षी पांडुरंग हिरवे ( गुरुजी) यांच्या लोकसहभागातून सूरू असणाऱ्या पैजारवाडी (जि.कोल्हापूर) येथील स्मारकाला देणगी म्हणून भेट दिली.