मुंबई – शिवसेना-भाजप युतीची औपचारिक घोषणा कधी होईल हे मला ठाऊक नाही. यासंदर्भात मी भविष्यवाणी करू शकत नाही. मात्र, युतीची चर्चा अंतिम टप्प्यात होणार आहे. महायुतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा योग्य दिशेने चालली आहे. लवकरच युतीची घोषणा होईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा सांगितले.
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. विधानसभा निवडणूकीच्या जागावाटपावरून शिवसेना-भाजपातील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. दोन्ही पक्ष जास्तीत जास्त जागा आपल्या पदारात पाडून घेण्यासाठी वाटाघाटी करीत आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, चंद्रकांत पाटील म्हणाले, युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असून जागावाटपावर सहमती झाल्यानंतर युतीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते.
भविष्याचा अभ्यास मी कॉंलेजमध्ये शिकत असताना करायचो पण आता खंड पडला आहे. त्यामुळे भविष्य सांगणे सोडले आहे. मात्र युतीची घोषणा लवकरच होईल. शिवसेना व भाजपच्य नेत्यांमध्ये महायुचीची चर्चा योग्य दिशेने सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे हे युतीची घोषणा लवकरच करतील, असेही पाटील म्हणाले.
पराभव मला ठाऊक नाही.
मला पराभव ठाऊक नाही
शेतकरी स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील निवडणुकीला उभे राहिल्यास त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणार अशी घोषणा केली आहे. त्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, जर पक्षाने मला निवडणूक लढविण्याचा आदेश दिला तर मी मागे-पुढे पाहणार नाही. निवडणूक ही माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही. निवडणुकीला सामोरे जाण्यास मी घाबरत नाही. मात्र, मी निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल. मला आव्हान देणाछयांना मी एवढेच सांगेन की मला पराभव ठाऊक नाही, अशा शब्दात पाटील यांनी ठणकावले.
उद्धव ठाकरेंच्या चर्चेनंतर राणेंचा निर्णय
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचे टाळले. पण भाजप हा पक्ष आपल्या सहयोगी पक्षांशी चर्चा करून निर्णय घेणारा पक्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करून नारायण राणेंबाबत निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले.