मुंबई – बिहारमधील कोणतीही निवडणूक म्हणजे दंगाधोपा, हाणामारी, धमक्या आणि बंदुकीची दहशत असेच समीकरण असते. अलीकडच्या काळात अशी दहशत कमी झाली असली, तरीही अजून असे अनेक प्रकार पडद्याआड सुरु असल्याचे सिद्ध करणारी एक घटना समोर आली आहे.
बॉलिवुडच्या एका ब्लॉकबस्टर हिट अभिनेत्रीने असे आरोप केले आहेत की, चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या नेत्यांनी विद्यमान निवडणुकीदरम्यान आपल्याला सक्तीने प्रचारात उतरवले; त्यांच्याविषयी चांगले बोलायला लावले आणि अस्से न केल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली.
दिनांक 26 ऑक्टोबर रोजी बिहारच्या औरंगाबादच्या ओबरा विधानसभेचे लोक जनशक्ती पक्षाचे नेते प्रकाश चंद्रा यांच्या प्रचारासाठी ही अभिनेत्री गेली होती. यादरम्यान माझ्यावर बलात्कार झाला असता आणि माझी हत्याही झाली असती. मी मोठ्या मुश्किलीने त्या संकटातून सुटल्याचे तिने सांगितले आहे. त्यांनी जबरदस्तीने त्यांचा प्रचार करण्यास सांगितले. तसेच न केल्यास धमकीही दिल्याचा आरोप तिने केला आहे.
ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून “कहो ना प्यार है’ च्या सुपरडुपर हिट सिनेमाची नायिका आमिषा पटेल आहे. अमिषा 26 ऑक्टोबर रोजी बिहारच्या औरंगाबादच्या ओबरा विधानसभेचे लोक जनशक्ती पक्षाचे नेते प्रकाश चंद्रा यांच्या प्रचारासाठी गेली होती.
यावेळी तिने सनरुफ कारने रोड शो केला होता. तिथे घडलेल्या घटनेसंदर्भात अमिषा म्हणाली, मी एक पाहुणी म्हणून डॉ. प्रकाश चंद्रा यांच्याकडे गेले होते. मात्र, त्यांनी मला ब्लॅकमेल केले आणि धमकावले. त्यांनी माझ्या टीमशी गैरवर्तन केले.
मी सायंकाळी मुंबईला परत आल्यानंतर देखील त्यांनी मला धमकी देणारे मेसेज आणि कॉल केले. तसेच माझ्याबद्दल चांगले बोला आणि 26 ऑक्टोबरला जे घडले त्याविषयी बोलू नका. आम्ही पैसे देतो पण लोकांसमोर आमच्याविषयी चांगले बोल, असे सांगितले.
मात्र, आता याबाबत आपण काय पवित्रा घेणार आहोत, हे अद्याप आमिषाने जाहीर केलेले नाही. या प्रकाराविषयी सबळ पुराव्यांच्या आधारे कायदेशीर लढाई लढण्याचा पर्याय आमिषासमोर खुला आहे.