Chandigarh Mayor Election। चंदीगडमध्ये महापौर निवडणुकीबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राजकीय युती शिगेला पोहोचलीय. या निवडणुकीवरून आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र या सुनावणीपूर्वी आपचे तीन नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आलीय. एक पुरुष आणि दोन महिला नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. ते येत्या काही दिवसांत पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
आम आदमी पक्षाचे तिनही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येतय. गुरुग्राममध्ये लवकरच होणाऱ्या भाजपच्या कार्यक्रमात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्या उपस्थितीत तिन्ही नगरसेवक भगवा परिधान करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भाजपकडे 14 ऐवजी 17 नगरसेवक असतील, तर भाजप खासदाराचे एक मत पक्षाच्या खात्यात जाईल.
मागील दोन दिवसापासून आम आदमी पक्षाच्या दोन महिला नगरसेवक आणि अन्य एक जण शहराबाहेर असल्याची माहिती समोर आलीय. मात्र, शनिवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. एका नगरसेवकाने कार्यक्रमाला गेल्याची चर्चा आहे. तर दुसऱ्या नगरसेवकाने आपण पक्षांतर्गत आनंदी नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. दुसरीकडे ‘आप’चे तिन्ही नगरसेवक भाजपमध्ये गेल्यास भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित महापौर मनोज सोनकर राजीनामा देण्याची शक्यता आहे.
30 जानेवारीला महापौरपदाची निवडणूक झाली Chandigarh Mayor Election।
३० जानेवारी रोजी झालेल्या महापौर निवडणुकीत प्रशासनाने नियुक्त केलेले पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी आठ नगरसेवकांची मते अवैध ठरविल्यानंतर भाजपचे मनोज सोनकर यांची महापौरपदी वर्णी लागली होती. मात्र युतीने याला आव्हान देत प्रथम उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
पीठासीन अधिकाऱ्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते अवैध ठरलेल्या नगरसेवकांच्या मतांवर कथित चिन्हांकित करताना दिसत होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने चंदीगड प्रशासनाला फटकारले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे. त्याबाबत चंदीगड प्रशासनाकडून उत्तर दाखल करण्यात येणार आहे.