अभिनेता अल्लू अर्जुन अडचणीत ! आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Allu Arjun case filed । आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता अल्लू अर्जुन अडचणीत आला आहे. त्याच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्लू अर्जुन आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे आमदार रविचंद्र किशोर रेड्डी यांच्यावर आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आलाय. विनापरवानगी आमदार निवासात मोठी जाहीर सभा आयोजित केल्याचा आरोप दोघांवर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार रेड्डी यांनी कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय अल्लू अर्जुनला नंद्याला मतदारसंघात बैठकीसाठी बोलावले होते. अशा परिस्थितीत हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन मानले जात आहे. त्यानुसार आमदार रेड्डी तसेच अल्लू अर्जुन यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
एफआयआर कोणी दाखल केला? Allu Arjun case filed ।
अहवालानुसार, अल्लू अर्जुन आणि आमदार रेड्डी यांच्या विरोधात हा गुन्हा आंध्र प्रदेशातील नांद्याला मतदारसंघातील निवडणुकांवर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त नंद्याला ग्रामीणचे उप-तहसीलदार पी. रामचंद्र राव यांनी नोंदवला आहे.
मित्राला भेटायला आलो होतो Allu Arjun case filed ।
दरम्यान आमदार रविचंद्र किशोर रेड्डी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर अल्लू अर्जुन यांनी स्पष्ट केले की, “मी आपल्या मित्राला मदत करण्यासाठी नांद्याला येथे आलो आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नाही. माझी भेट एका मित्रासाठी होती.”असे त्यांनी म्हटले. अभिनेता अल्लू अर्जुन याने या प्रकरणी एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, “मी येथे माझ्या स्वेच्छेने आलो आहे. जर माझे कोणी मित्र, मग ते कोणत्याही क्षेत्रात असले तरी त्यांना माझ्या मदतीची गरज असेल तर मी पुढे येऊन त्यांना मदत करेन. याचा अर्थ असा नाही की मी कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत आहे.
आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक
आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. येथे लोकसभेच्या 25 जागा आहेत. या सर्व 25 जागांसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. याशिवाय येथील 175 विधानसभा जागांसाठीही 13 मे रोजी मतदान होणार आहे.





