पुणे- मॉडेल उर्फी जावेद प्रकरणात मला महिला आयोगाने नोटीस बजावली आहे, असे महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सांगितले असले तरी एकट्या चाकणकर म्हणजे महिला आयोग नाही. एकटी मी म्हणजे आयोग, असे वाटत असेल तर ते डोक्यातून काढा, अशी टीका भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली.
भाजपच्या शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत वाघ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पुष्कर तुळजापूरकर, धनंजय जाधव यावेळी उपस्थित होते. वाघ म्हणाल्या की, महिलांचे काम चुल व मूल नाही. पण, त्यांचा स्वैराचार होत असेल तर बोलले पाहिजे.
कोणी काय कपडे घालावेत, हे स्वातंत्र्य आहे. पण, अंगावर कपड्यांचे तुकडे लावले जात आहेत, त्यावर मी बोलत आहे. हा विषय राजकारणाचा नाही, आधी समाज स्वास्थ महत्त्वाचे आहे. त्यामुळे सार्वजनिक स्वैराचाराला खतपाणी घालू नका. आम्ही आमची भूमिका मांडून, पोलिसांकडे तक्रार केली. तुम्हाला आमच्यावर आरोप करायला गूळ-खोबरे देऊन बोलवले नाही.
उर्फी भेटली तर तिला थोबाडीत लावेन, असे वक्तव्य यापूर्वी चित्रा वाघ यांनी केले होते. त्यावर तुम्ही तिला ड्रेस किंवा साडी भेट का देत नाही, असे विचारले असता वाघ यांनी ही चांगली सूचना आहे. तिला थोबाडीत लावण्यापूर्वी साडी-चोळी भेट देऊन एक संधी देणार असल्याचे म्हटले.