परभणी – येथे हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडले आहे. येथिल मुस्लिम बांधवाने शिवपुराण कथेसाठी जागा दिली आहे. त्यांच्या 15 एकर तूर आणि साडेतीन एकर हरभऱ्यावर नांगर फिरवून ही जागा उपलब्ध करून दिली आहे. मुस्लिमांचा इजतेमा हिंदूंच्या जागेवर अन् हिंदूचे शिवपुराण चक्क मुस्लिमाच्या जागेवर परभणीत होत आहे.
“जगात जर्मनी अन् भारतात परभणी”अशी म्हण परभणीबाबत प्रचलित आहे. इथल्या माणसांमध्ये कुणालाही आपलेसे करण्याची परंपरा आहे. इथे सर्वच समाज बांधव सर्वधर्म समभावाने वागतात. परभणीत आठ डिसेंबरला मुस्लिम समाजाचा इजतेमा पार पडला. तीन दिवस लाखो मुस्लिम बांधव येथे आले होते. धर्माची शिकवण घेतली. त्यांच्यासाठी इथे हिंदू बांधव मदतीला आहे. इजतेमासाठी हिंदूंची जमीन देण्यात आली, तसेच इतर सोयीसुविधांची हिंदु समाजातील तरुणांनी व्यवस्था केली होती.
शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी येत्या 13 ते 17 जानेवारी दरम्यान परभणीत पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांचे शिवपुराण आयोजित केले आहे. यासाठी परभणीतील प्लॉटिंग व्यासायिक हाजी शोएब यांनी पुढाकार घेऊन आपली 60 एकर जमीन या शिवपुराण कथेसाठी विनामूल्य वापरासाठी दिली आहे. एवढेच नाही तर यातील 15 एकर वर त्यांची तूर आणि साडे तीन एकर वर लावलेल्या हरभऱ्यावर त्यांनी नांगर फिरवत हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमासाठी लाखोंचे नुकसान सहन केले आहे. आता या ठिकाणी शिवपूराण कथा होणार आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक याठिकाणी पाहायला मिळाले आहे. हा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा, असे अनेकजण बोलत आहेत.