नवी दिल्ली : ओमायक्रॉनने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत. यात गरज लागली तर नाईट कर्फ्यू लावा असा आदेशच दिला आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमयक्रॉन तीन पट संसर्गजन्य असून त्याला रोखण्यासाठी वॉर रुमची गरज असल्याचेही केंद्राने राज्यांना सांगितले आहे.
केंद्राने राज्यांना काही सूचना केल्या असून यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचणी, नाईट कर्फ्यू आणि गर्दीवर नियंत्रण अशा मुद्द्यांचा उल्लेख आहे. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठवलं असून स्थानिक परिस्थितीनुसार काळजी घ्यावी असे सांगितले आहे. तसेच गरज लागल्यास मार्गदर्शक तत्वे जाहीर करावी असेही म्हटले आहे.
गेल्या आठवड्यातील पॉझिटिव्हीटी रेट १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास किंवा ऑक्सिजन तसेच आयसीयू बेडसाठी ४० टक्के व्याप्ती असेल तर ही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जाऊ शकतात असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. केंद्राने यावेळी पत्रात दूरदृष्टी, डेटा विश्लेषण, महत्वाचे निर्णय घेणे आणि कठोर तसेच त्वरित प्रतिबंधात्मक कारवाई यासंबंधी उल्लेख केला आहे.
राज्य आणि केंद्राशासित प्रदेशांना तसेच जिल्हा स्तरावर अत्यंत तत्परतेने आणि लक्ष देऊन उपाय आणि कठोर निर्बंधांसंबंधी निर्णय घेण्याची गरज असल्याचेही पत्रात म्हटले आहे. केंद्राने यावेळी दारोदारी जाऊन रुग्णांचा शोध घेणे आणि करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांची माहिती घेण्यासंबंधी सुचवले आहे.
जिनोम सिक्वेन्सिंगसाठी क्लस्टर इन्फेक्शनचे नमुने ताबडतोब INSACOG लॅबमध्ये पाठवले पाहिजेत असेही सांगण्यात आले आहे. १०० टक्के लसीकरण होईल यासाठी राज्यांनी जास्त प्रयत्न करावेत असे यावेळी सुचवण्यात आले आहे. तसेच हॉस्पिटल बेड्स, रुग्णवाहिका, ऑक्सिजन सामग्री, औषधं अशा आरोग्यासंबंधी पायासुविधांसाठी आपत्कालीन निधीचा वापर करण्यासंबंधीही सुचवण्यात आले आहे.