केंद्रीय निवडणूक आयोग प्रशिक्षण केंद्र पुण्यात

बावधन, ताथवडे, वाघोलीत जागांची पाहणी

पुणे – केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रशिक्षण केंद्र हे पुण्यात होणार आहे. यासाठी जागेचा शोध सुरू आहे. या प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रासह इतर चार राज्यांना उपयुक्त ठरणार आहे. या केंद्रामध्ये निवडणूक विषयक कामाची माहिती देणे, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, त्यांच्या राहण्याची व्यवस्था असणार आहे.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नुकतीच पुण्यात येऊन बावधन, ताथवडे आणि वाघोली येथील जागांची पाहणी केली. या केंद्रासाठी सुमारे दोन एकर जागेची आवश्‍यकता आहे. त्यादृष्टीने योग्य व सोयीस्कर जागेची निवड केली जाणार आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे या केंद्रामुळे सोयीचे ठरणार आहे. यापूर्वी अशा प्रकारचे प्रशिक्षण हे प्रामुख्याने “यशदा’ येथे होत असत. आता मात्र आयोगाला हक्काची जागा उपलब्ध होणार आहे.

या केंद्रामध्ये सभागृह, ग्रंथालये, अधिकाऱ्यांसाठी राहण्याची सोयदेखील असणार आहे. हे प्रशिक्षण केंद्र विमानतळ, रेल्वे आदींपासून सोयीच्या अंतरावर असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांमधील अधिकारी त्याचबरोबर बाहेरील राज्यांमधील अधिकाऱ्यांनासुध्दा हे केंद्र सोयीचे असणार आहे. त्यामुळे पुणे येथेच हे केंद्र व्हावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.