काळेवाडीत तात्पुरत्या कामाचा घाट : नागरिक संतापले
पळसदेव (वार्ताहर) – इंदापूर तालुक्यातील पुनर्वसित पळसदेव गावातील काळेवाडीसाठी विविध कामांसाठी सुमारे 80 लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. यात ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे स्मशानभूमी आणि रस्त्यासाठी मंजूर असलेला 25 लाखांचा निधी परतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
वस्तीवरील नागरिकांना विश्वासात न घेता ठेकेदार भीमा नदी पात्रात मातीचा भराव करून त्याठिकाणी स्मशानभूमी उभा करून वस्ती ते स्मशानभूमीपर्यंत रस्ता करून निधी काढून घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ठेकेदाराने नदीपात्रात तात्पुरती स्मशानभूमी उभा करून निधी खर्च करण्याचा घाट घातला आहे. नागरिकांवर विविध मार्गांनी दबाव टाकून नदीपात्रात स्मशानभूमी उभी करून निधी काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, याला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे.
उजनीसाठी संपादित जागेत विकासकाम करायचे असल्यास तसा प्रस्ताव देऊन त्याची मंजुरी आवश्यक आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी झाल्यावर जमिनीचे मूळ मालक या जमिनीत पिके घेत आहेत, त्यामुळे काळेवाडी भागातील नेमक्या कोणत्या शेतकऱ्याची जमिनीत स्मशानभूमी होणार, याबाबत नागरिकांना कल्पना नाही. विनापरवाना स्मशानभूमी बांधल्यास त्या जागेबाबत वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ठेकेदाराने ग्रामपंचायतीच्या वतीने रीतसर ठराव घेऊन व शेतमालकाची संमती दिलेल्या जागेतच स्मशानभूमी उभारावी, अशी मागणी जोर धरत आहे.
उजनी धरणासाठी संपादित जमिनीत स्मशानभूमीसाठी जागेबाबत ग्रामपंचायतीने अद्याप कोणताही प्रस्ताव दिला नाही.
– दादासाहेब भुजबळ, ग्रामसेवक, पळसदेव काळेवाडी.
ग्रामपंचायतीने ठराव करून पुनर्वसन अधिकाऱ्यांकडे जागेची मागणी केल्यास स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध होऊ शकते.
– एस. एन. मेटे, शाखा प्रमुख, पाटबंधारे विभाग. पळसदेव.
नागरिक सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे कामात दिरंगाई होत आहे. या कामाबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी भेट दिली होती. कामात अडथळे आणणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी नागरिकांना सांगितले आहे. पाऊस कमी झाल्यावर आम्ही कामास सुरुवात करू.
– संपत पवार, ठेकेदार.