पुणे- करोना आणि लॉकडाऊननंतर यंदा पहिल्यांदाचे मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदान येथे ईद-ऊल-फित्र अर्थात रमजान ईदनिमित्त सामूदायिक नमाज अदा केली. यावेळी अल्लाहकडे विश्वशांतीची दुवॉं मागण्यात आली.
ईदच्या निमित्त सोलापूर रस्त्यावरील ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज अदा करण्यात येते. यंदाही शेकडो समाजबांधव मंगळवारी ईदनिमित्त एकत्र आले होते. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, ईदगाह ट्रस्टी, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना, लष्कर पोलीस स्टेशन शांतता कमिटी आदी संस्था आणि संघटनांच्या वतीने ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यादरम्यान, करोना काळात मृत पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना श्रद्धांजलीदेखील अर्पण करण्यात आली. नमाज अदा करायला आलेल्यांनी येथे दानधर्म केला.यावेळी घरी येणारे पाहुणे, मित्रमंडळींसह शिरखुर्म्याचा आस्वाद घेण्यात येत होता. सोशल मीडियावरून देखील “ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देण्यात येत होत्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 27 च्या वतीने मोहम्मदिया मशिद (लोहियानगर) येथे गुलाबपुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. संजय गायकवाड, पुणे शहर युवती सरचिटणीस श्वेता गायकवाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी युसुफ शेख यांसह मशिदीचे सभासद उपस्थित होते.
परदेशी विद्यार्थ्यांनीही साजरी केली ईद
आझम कॅम्पसमध्ये शहरातील परदेशी विद्यार्थ्यांनी रमजान ईद साजरी केली. यादरम्यान, कॅम्पसच्या “मस्जिद-ए-आझम’ या मशिदीत नमाज पठण केले. यानंतर गळाभेटी घेऊन ईदच्या शुभेच्छांची देवाण-घेवाण केली. यावेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार, संस्थेचे पदाधिकारी “अवामी महाज’ सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना चॉकलेट, गुलाब आणि अत्तर देत शुभेच्छा दिल्या.