प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 – आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करुन मानवतेचा संदेश द्यावा, असे आवाहन पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीचे) आयुक्त सुहास दिवसे यांनी आज येथे व्यक्त केले.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी दिवसे बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, सीबआंतरराष्ट्रीय विद्यार्थी कौन्सिलची अध्यक्ष प्रार्थना उदय आदी उपस्थित होते. यावेळी 85 देशांमधून जमलेल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करीत, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस साजरा केला. विद्यार्थ्यांनी डॉ. मुजुमदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दिवसे म्हणाले, “”आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी एकमेकांचे प्रश्न समजत, त्यांची सुख-दुःख जाणून घेतली पाहिजे. कोणतेही संकट आल्यावर, डिप्रेशनमध्ये न जाता आपल्या मित्रांशी संवाद साधत त्याच्यातून मार्ग काढा. सिंगापूरमध्ये मी पब्लिक पॉसिलीचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेलो असताना, माझ्यासोबत 25 देशांचे विद्यार्थी शिक्षणासाठी होते. त्यामुळे मला आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रश्न माहिती आहेत. आपल्या परदेशी मित्रांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याचा अनुभव मिळतो. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणाच्या वेळी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून मिळालेला अनुभव आपल्याला करिअर घडवण्यासाठी उपयोगी पडतो. सिम्बायोसिसने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची काळजी घेत, एक प्रकारे मानवता आणि शांततेचा संदेश दिला आहे.”
डॉ. येरवडेकर यांनी स्वागतपर भाषणात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवसाच्या आठवणी सांगितल्या. डॉ. मुजुमदार यांनी पुण्यातील आणि सिम्बायोसिसमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवासाची माहिती सांगत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. डॉ. गुप्ते यांनी आभार मानले.