सीसीटीव्ही बसणार; मात्र सिग्नल यंत्रणेचे काय?

सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बारामती शहरात 172 सीसीटीव्ही बसवण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. जवळपास दीड कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार असल्याने नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे. असे असले तरी सीसीटीव्हीप्रमाणे शहरातील सिग्नल यंत्रणा सुरू करावी व वाहतूककोंडीतून सुटका करावी, अशी माफक अपेक्षा बारामतीकरांची आहे.

बारामती शहरातील बंद अवस्थेत असलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात लाखो रुपयांची तरतूद करण्यात येते मात्र, यंत्रणा कार्यान्वित का होत नाही? यंत्रणा कार्यान्वित नसल्याने वाहनचालक मनमानीपणे वाहने हाकत असल्याने शहरातील मुख्य रस्ते, चौकांमध्ये वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी सिग्नल यंत्रणा आवश्‍यक असतानाही त्याकडे नगरपरिषद दुर्लक्ष का करीत आहे? की प्रशासनाला सिग्लन यंत्रणा कार्यान्वितच करायची नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. वाढते नागरिकरण तसेच वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेता शहरातील वाहतूककोंडी सोडवण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाच्या काही चौकात सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली; मात्र सुरुवातीचे काही दिवस सोडले, तर ही यंत्रणा कोलमडलेली आहे.

शहरातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या इंदापूर, भिगवण, एमआयडीसी चौकात ही यंत्रणा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या चौकात वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच झाला आहे. भिगवण रस्त्यावर विकासासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, बंद अवस्थेत असलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे या रस्त्यावरील कोंडी फुटता फुटत नाही. तर इंदापूर चौकातील दिवे लावल्यापासून अद्यापपर्यंत लागलेच नाहीत. तर आता सिग्नल यंत्रणेचे साहित्य देखील चोरी झाले आहे. एमआयडीसी चौकात यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याची गरज आहे; मात्र नगरपरिषदेचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने येथे छोटो-मोठे अपघात नित्याचेच झाले आहे. या ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच नगरपरिषद प्रशासन जागे होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)