पुणे महापालिकेच्या क्रीडा संकूल, मैदानांचे सर्वेक्षण सुरू

क्रीडा विभागाच्या ताब्यात येणार मिळकती

पुणे – महापालिकेची शहरातील क्रीडा संकुले तसेच मैदानांचे सर्वेक्षण क्रीडा विभागाकडून करण्यात येत आहे. शहरातील सुमारे 53 क्रीडा संकुले आणि मैदाने मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून यंदाच्या वर्षीपासून क्रीडा विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. त्यामुळे हे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती क्रीडा विभागाच्या प्रमुख डॉ. वनश्री लाभशेटवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

महापालिकेकडून स्वतंत्र क्रीडा धोरण करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र क्रीडा विभागाची स्थापनाही केली आहे. मात्र, या विभागाकडून केवळ महापौर चषक स्पर्धांच्या संयोजना व्यतिरिक्‍त काहीच केले जात नाही. तर शहरात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी बांधण्यात आलेली क्रीडा संकुले तसेच मैदानांचे व्यवस्थापन मालमत्ता विभागाकडे देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक उपक्रमांच्या संयोजनात या विभागास काम करताना अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन पालिकेच्या जलतरण तलावांसोबतच क्रीडा संकुले आणि मैदाने आता क्रीडा विभागाकडे हस्तांतरीत केली जाणार आहेत. त्यामुळे ही ताब्यात घेण्यापूर्वी त्या ठिकाणची सद्यस्थिती, ती कोणाला चालवायला दिली आहेत. किती जणांचे करार आहेत, त्या ठिकाणी काय सुविधा आहेत याचे सर्वेक्षण क्रीडा विभागाकडून करण्यात येत आहे. त्यानंतर या मिळकती ताब्यात घेऊन त्याचे नियोजन केले जाणार आहे.

अवघ्या पाच कर्मचाऱ्यांवर कारभार
क्रीडा विभागाचे प्रशासकीय कामकाज वाढविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात या विभागाकडे अवघे 5 कर्मचारी आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्यावर सर्व कामाची दारोमदार आहे. तर हे सर्व कर्मचारी नेहरू स्टेडीयम येथील कार्यालयात असल्याने त्यांचा बहुतांश वेळ महापालिकेत ये-जा करण्यासाठी होतो. ही बाब लक्षात घेऊन या विभागासाठी अतिरिक्‍त कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली, असल्याची माहिती डॉ. लाभशेटवार यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.