नेवासा – नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेवासा भागात फरार आरोपीचा शोध घेत असताना पथकास माळीचिंचोरा फाटा भागात संशयास्पद ट्रक दिसला. प्रत्यक्ष पाहणीत बंदी असलेल्या मांगूर माश्यांची वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. आठ लाख रुपये किमतीचे 4 टन जिवंत मांगुर मासे व 25 लाखांचा आयशर ट्रक जप्त करण्यात आला.
नगरच्या सहायक मत्स विकास आधिकारी प्रतिभा दत्त यांनी याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कायद्याने वाहतूक व विक्रीस बंदी असलेले मांगुर मासे नगर-औरंगाबाद रस्त्याने मध्यप्रदेश मध्ये घेवून जात असताना ट्रक ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी बप्पा ताजरुल विश्वास व ताकोमल मियाराज विश्वास (दोघे रा.अर्शकारी, पश्चिम बंगाल) यांच्यावर कारवाई करून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप पवार, संदीप घोडके, मनोहर गोसावी, दत्तात्रेय गव्हाणे व पथकाने ही धाडसी कारवाई केली. पोलीस निरीक्षक विजय करे व पथकाने महत्वाची भूमिका निभावली.