शेवगाव (प्रतिनिधी) -स्वस्त धान्य दुकानातील 60 गोण्या तांदूळ व 100 गोण्या गहू असे 80 क्विंटल शासकीय धान्य काळ्या बाजारात विक्रीला नेणारा ट्रक अमरापूर ग्रामस्थांच्या सतर्कतेने सोमवारी (दि. 8) सायंकाळी पकडण्यात आला.
दरम्यान, आज ट्रक चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सोपानराव गोरे पुढील तपास करत आहेत.
यासंदर्भात माहिती अशी की, स्वस्त धान्य दुकानातील गहू व तांदुळ आयशर ट्रक (क्र- एम.एच.16, ए.ई. 3345) मधून काळ्या बाजारात विक्रीला नेत असताना अमरापूर गावाजवळ पकडण्यात आला.
या ट्रकमधे 60 गोण्या तांदूळ व 100 गोण्या गहू असे 80 क्विंटल शासकीय धान्य विक्रीला जात होते. धान्याने भरलेला ट्रक अमरापूर जवळील पाण्याच्या टाकीजवळ संशयितरित्या रस्त्यावर उभा होता.
तेव्हा काही सतर्क नागरिकांनी तहसील कार्यालयास याची माहिती दिल्यानंतर नायब तहसीलदार व्हि. के. जोशी व प्रभारी पुरवठा निरीक्षक एस.एम.चिंतामनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या धान्यांचा पंचनामा केला .
हे धान्य शेवगाव शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयाच्या पाठीमागील केसभट वस्तीत असणार्या खाजगी पटागंणातून भरण्यात आले व कुठे खाली करायचे हे अमरापूर येथे सांगण्यात येईल, अशी सुचना दिल्याचा जबाब ट्रक चालक प्रल्हाद दिनकर पवार (रा. नवगन राजुरी, ता.जि.बिड) याने दिला आहे.
या ट्रक चालकाकडे कुठलेही परमिट व वाहतुक मार्ग नव्हता. सदर ट्रक पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून उशिरापर्यंत कारवाई चालू होती.