पुणे – डेंग्यू रोगाच्या पार्श्वभूमीवर डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण केल्याबद्दल 30 जणांना महापालिका आरोग्यविभागाने नोटीस बजावल्या आहेत. त्यामध्ये महापालिकेच्याच एका विभागाचाही समावेश आहे, असे प्रशासनाने सांगितले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथरोगांचा फैलाव वेगाने होतो. त्यातूनही डासांद्वारे होणारे डेंग्यू, मलेरिया आदी रोगांचा फैलावही वेगाने होतो. गृहनिर्माण सोसायट्यांचे आवार, बंगले, फ्लॅट, बागा, आस्थापना, टेरेस याठिकाणी ठेवलेली अडगळ, पावसाचे साठणारे पाणी, कुंड्यांच्या खाली असणाऱ्या प्लेटमध्ये साठलेले पाणी, टायर, अन्य भंगार माल यामध्ये डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या रोगांचा प्रसार होतो.
पालिकेच्या वाहन डेपोच्या विभागात कुजलेले टायर आणि अन्य भंगारमाल ठेवण्यात आला आहे. ते भंगार कुजून, त्याठिकाणी पाणी साठून त्यात डासांची उत्पत्ती होऊ शकते. त्यामुळे त्यांना पहिली नोटीस देण्यात आली आहे. या माध्यमातून “वॉर्निंग’ देण्यात आली असून, स्वच्छता न केल्यास दुसरी नोटीस पाठवून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.