पुणे – “पीएमआरडीए’च्या माध्यमातून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प उभारला जात आहे. त्याच्या आराखड्यात केलेल्या बदलांना मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. महापालिकेला या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रसंगी रोख मोबदला देऊन करून द्यावे लागणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका क्र. 3 ला महापालिकेने डिसेंबर 2018 मध्ये मान्यता दिली आहे. 23 कि.मी. लांबीच्या या मार्गिकाचा 14 कि.मी. ट्रॅक आणि 14 स्थानके पुणे महापालिकेच्या हद्दीत आहेत. दरम्यान, या प्रकल्पासाठी लागणारी जागा महापालिकेने उपलब्ध करून द्यायची आहे, असा निर्णय 1 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. यापैकी खासगी जागेचे भूसंपादन हे महापालिकेने करायचे असून, टीडीआर, एफएसआय देऊन ज्या जागा संपादित होणार नाहीत, त्याच्या भूसंपादनासाठी येणारा खर्च महापालिकेने उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार पीएमआरडीएने प्रकल्पासाठी संपादित कराव्या लागणाऱ्या जागांची यादी महापालिकेला पाठवली आहे. भूसंपादनाची कार्यवाही तातडीने करताना आराखड्यात सुचवलेल्या काही बदलांनाही महापालिकेची मान्यता मागितली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवला आहे.
यामध्ये मेट्रो मार्गावरील प्रस्तावित स्थानके आणि मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या जिन्यांचे स्थान नकाशावर दर्शवल्याप्रमाणे मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी महापालिकेची परवानगी, विकास आराखड्यातील रस्त्याच्या मध्य रेषेनुसार पिलर उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, महापालिकेच्या विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्ता रुंदीनुसार जागा उपलब्ध करून देणे एचसीएमटीआरच्या आखणीच्या ठिकाणी सुयोग्य नियोजन करणे वगैरे बाबींसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.