पंढरपूर – पोलिस असल्याचे भासवत तरूणीला लग्नाच्या जाळ्यात ओढणाऱ्या तोतया पोलिसाला पंढरपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायलयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. रमेश सुरेश भोसले असे या तोतया पोलिसाचे नाव आहे. नकली नाव, नकली वर्दी, नकली पिस्टल, नकली आधारकार्ड आणि थेट नकली पोलीस अधिकारी असलेले ओळखपत्र घेऊन हा भामटा मुलींना जाळ्यात ओढायचे काम करत होता. एका तरूणीच्या सर्तकतेमुळे लग्नाच्या बेडीत अडकण्याऐवजी पोलिसांनी या तरूणाला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी रमेशने सोशल मीडियावर पोलीस ड्रेसमधील काही व्हिडीओ शेअर केले होते. पंढरपूर शहरातील एक तरुणी पोलीस बनण्यासाठी यमाई ट्रॅकवर धावण्याचा व्यायाम करत असताना या भामट्याने तिला हेरले. तिच्याशी ओळख काढण्यासाठी तिला धक्का देऊन नंतर सॉरी म्हणत आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. त्याने आपले नाव संग्राम भोसले असे सांगून तरूणीसोबत ओळख केली. मंगळवेढा पोलीस ठाण्यात सब इन्स्पेक्टर असून माझे वडील आयपीएस आहेत. तुला पोलिसात नोकरी लावतो असे सांगितले.
ओळख वाढवून त्याने मुलीच्या घरच्यांकडे तिचा हात मागितला. तरूणीला त्याचा संशय आल्याने तिने थेट मंगळवेढा पोलिस ठाणे गाठले. तेथे संग्राम भोसले नावाचा कोणी पोलीस अधिकारी आहे का? याची चौकशी केली असता, असा कोणी अधिकारी नसल्याचे तिला समजले. यानंतर तिचा संशय वाढल्याने या तरुणीने थेट पंढरपूर दामिनी पथकातील अधिकारी प्रशांत भागवत यांच्याशी संपर्क साधला.
हे प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी ट्रॅप लावत या भामट्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता यापूर्वी देखील त्याने पोलीस अधिकारी असल्याचे भासवत एका मुलीला फसवल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी या नकली पोलीस अधिकाऱ्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने आपले कारनामे सांगितले. वर्दी सोलापूर येथून खरेदी केली, नकली आधारकार्ड, पोलीस ओळखपत्र झेरॉक्स दुकानातून बनवून घेतले. पोलीस अधिकारी आहे असे सांगितल्यानंतर मुली भुलतात म्हणून हे नाटक केल्याची कबुली या भामट्याने पोलिसांकडे दिली. त्यानंतर त्याच्यावर फसवणुकीसह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज त्याला पंढरपूर न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, तरुण मुलींनी अशा कोणत्याही खोट्या प्रलोभनांना न भुलत कोणी त्रास देत असेल तर तातडीने पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे.