मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात विविध संघांनी आपल्याकडे खरेदी केले नाहीत अशा सात प्रमुख क्रिकेटपटूंनी चक्क ढाका प्रीमिअर लीगचा रस्ता धरला आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या मोसमापूर्वी झालेल्या लिलावात विविध भारतीय खेळाडूंना विविध संघांनी खरेदी केली. जे खेळाडू विकले गेले नाहीत त्यापैकी काही जण बांगलादेशात जाणार आहेत. हनुमा विहारीसह अभिमन्यू ईश्वरन, परवेज रसूल, बाबा अपराजित, अशोक मनेरिया, चिराग जानी आणि गुरिंदर सिंग हे सात खेळाडू येत्या काळात या लीगमध्ये खेळणार असून बीसीसीआय त्यांना परवानगी देणार का हा प्रश्न आहे.
हनुमा विहारी ढाका प्रीमियर लीगमध्ये अबाहानी लिमिटेडकडून खेळताना दिसणार आहे. अभिमन्यू ईश्वरन प्राइम बॅंकेकडून खेळणार आहे. शेख जमाल धानमोंडीकडून परवेज रसूल, रूपगंज टायगरकडून बाबा अपराजित, खेलाघरकडून अशोक मनेरिया, लिजेंड ऑफ रुपगंजकडून चिराग जानी आणि गाझी ग्रुप क्रिकेटर्समधून गुरिंदर हे खेळाडू खेळतील.
विहारी, ईश्वरन, अपराजित, मनेरिया आणि रसूल हे यापूर्वी ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळले आहेत. कोरोनाचा धोका जगभरात परसण्यापूर्वी हे खेळाडू या लीगमध्ये खेळले होते. क्रिकेटपटू दिनेश कार्तिक, मनोज तिवारी आणि युसूफ पठाण हे खेळाडूही ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळले आहेत.