नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात ट्विटरवर खोटा आरोप आणि खोटा व्हिडीओ टाकून त्यांची बदनामी केल्याच्या प्रकरणात कॉंग्रेसच्यावतीने भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांच्या विरोधात कर्नाटकात बंगळुरू पोलिसांत एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल गांधी हे विदेशात भारताची बदनामी करीत असून भाजपच्या व हिंदुच्या विरोधात द्वेष पसरवण्याचे कसे काम करीत आहेत याची माहिती देणारा व्हिडीओ अमित मालविय यांनी टाकला आहे. अमेरिकेत राहुल गांधी यांनी काही इस्लामिक संघटनांशी संगनमत करून भारताची बदनामी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
कॉंग्रेस नेते रामबाबु यांनी पोलिसांत ही तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आयपीसी 153 ए, 120 बी आदि कलमांखाली अमित मालविय यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. हायग्राऊंड पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणी तपास करीत आहेत. अमित मालविय यांनी आपल्या ट्विट मध्ये राहुल गांधी हे भारतासाठी धोकादायक आहेत असे म्हटले आहे.
त्या अनुषंगानेही रामबाबू यांनी पोलिस तक्रारीत जोरदार आक्षेप घेतला आहे. मालविय यांच्या व्हिडीओ मध्ये राहुल गांधी हे हिंदु विरोधी आहेत असेही दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे ते असत्य आहे असेही रामबाबु यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात कायद्यानुसार योग्य ती कारवाई होईल असे परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांनी म्हटले आहे.
भाजपला खोटा प्रचार करण्यास आम्ही यापुढे मोकळीक देणार नाही असेही त्यांनी यावेळी सूचित केले. कर्नाटकातील आणखी एक मंत्री ईश्वर खंदारे यांनी म्हटले आहे की भाजप केवळ दिवस रात्र सोशल मिडीयावर खोटी माहिती पसरवण्याचेच काम करते. भाजप हा केवळ एक व्हॉट्सऍप युनिव्हर्सिटी झाला आहे असा आरोप त्यांनी केला आहे.