कार्ला – मागील काही दिवसांपासून वातावरण ढगाळ असल्याने या वातावरणाचा फुलोऱ्यावर आलेल्या तुरीसह गहू, हरभरा या पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सततचे ढगाळ वातावरण रोग व किडीला आमंत्रण देणारे ठरत असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने या काळात हमखास अनुभवायला येणारी गुलाबी थंडी कमी झाल्याचे दिसून येत आहे. सुरवातीचे काही दिवस तापमानाचा पारा खाली आला होता. काही दिवस पहाटे धुके पसरत होते. त्यामुळे आता गुलाबी आणि पुढे गारठवणाऱ्या थंडीचे दिवस येतील असा नागरिकांना अंदाज होता. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी काही दिवस शेकोटी पेटवून गप्पांचे फडही रंगू लागले होते. पण अचानक वातावरणाने कूस बदलली. आकाशात ढगांची गर्दी झाली आणि थंडी गायब झाली. या बदलत्या वातावरणाचा फटका तुरीसोबतच इतरही रब्बी पिकांना बसणार आहे. गहू, हरभरा या पिकांना थंडीची आवश्यकता असताना थंडीच नसल्याने या पिकांच्या उत्पादनांवर परिणाम होणार आहे. चांगला नफा देणारे खात्रीशीर आंतरपीक म्हणून तुरीच्या उत्पादनाकडे पाहिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली आहे. ढगाळ वातावरणाचा फटका तुरीला बसत आहे. हव्याहव्याशा थंडीनेही दडी मारली आहे. अनेक ठिकाणी तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीने हल्ला चढविल्याचे निदर्शनास येत आहे.
सद्यःस्थितीत तुरीचा फुलोरा बहरावर आहे. मात्र बदलत्या वातावरणामुळे फुलोरा गळण्याच्या मार्गावर आहे. असेच वातावरण कायम राहिल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. शेंगा पोखरणाऱ्या अळीवर नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणीचा पर्याय असला तरी ढगाळ वातावरणामुळे गळणारी फुले थांबविण्यासाठी कोणताही पर्याय नसल्याने पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच ढगाळ वातावरण निवळल्यावर धुके पडण्यास सुरुवात होईल. त्यामुळे तुरीबरोबर इतर पिकावरील संकट अधिकच वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यातूनच यंदा तुरीच्या एकूण उत्पादनाला त्याचा फटका बसण्याची शक्यता बळावली आहे.
यंदा हिवाळ्यात थंडी वाढली नाही. मागील आठवड्यात थंडीत थोड्याफार प्रमाणात वाढ झाली होती. मात्र त्यानंतर आता ढगाळ वातावरणामुळे फुलोऱ्यात आलेल्या तुरीचा बहार नष्ट होत आहे. तसेच थंडी आवश्यक असलेल्या रब्बी पिकांवर ही या वातावरणांचा परिणाम होत आहे. तुरीच्या उत्पादनाकडून असलेल्या अपेक्षाही आता मावळण्यात जमा आहेत.
– सदाशिव देवकाते, शेतकरी