पुणे – टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये विद्यार्थी, शिक्षक यांच्याबरोबरच नवीन उद्योग सुरू करणार्यांना व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी नवीन प्रशिक्षण विभाग सुरू करण्यात येणार आहे. ‘सेंटर फॉर इनोवेशन अँड आंत्रप्रेन्युरशिप डेव्हलपमेंट’ केंद्र टिमवित सुरू होणार आहे. यामध्ये व्यवसायाची निवड, प्रशिक्षण, शासकीय कर्ज योजना, भांडवल, योग्य बाजारपेठ यासंदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी दिली.
डॉ. गीताली टिळक यांनी टिमविच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाल्यानंतर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘इंस्पिरेशन’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी त्यांची स्किलेट्झ फाउंडेशनतर्फे ही निवड करण्यात आली आहे. ’इंस्पिरेशन या पुस्तिकेमध्ये 75 महिला उद्योजिकांची आणि त्यांच्या व्यवसायांची माहिती देण्यात आली आहे. विशेष योगदानाबद्दल यंदाच्या ’इन्स्पिरेशन’च्या मुखपृष्ठावर डॉ. गीताली टिळक यांची निवड करण्यात आली आहे.
स्किलेट्झ फाउंडेशनतर्फे महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे बिझक्वीन-2 कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, पिल्स कंपनीचे संजय कुलकर्णी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली टिमविमध्ये लवकरच सुरू होणार्या ’सेंटर फॉर इनोवेशन अँड आंत्रप्रेन्युरशिप डेव्हलपमेंट’ची घोषणा करण्यात आली. या प्रकल्पाचे नेतृत्व स्किलेट्झ आणि गुरुकीच्या संस्थापिका संचालिका डॉ. मीताली मोरे करणार आहेत. बिझ क्वीनच्या या कार्यक्रमामध्ये उद्योजिकांपैकी प्रत्येकीला नावीन्यपूर्ण शीर्षकाने गौरवण्यात आले. विजेत्यांमध्ये यातील नऊ जणांची निवड करण्यात आली.