पिंपरी – पिंपरी-चिंचवड, मोशी येथील उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून सोमवारपासून (दि. 19) मोटारी व जड वाहनांची चाचणी नाशिक फाटा येथील आयडीटीआरमध्ये घेण्यास सुरुवात केली आहे. तर, दुचाकीची चाचणी या कार्यालयाच्या इमारतीच्या मोकळ्या मैदानात होणार असल्याची माहिती उप प्रादेशिक अधिकारी अतुल आदे यांनी दिली.
प्रशासकीय कारणास्तव आणि जनतेच्या सोयीसाठी 19 ऑक्टोबरपासून पिंपरी-चिंचवड कार्यालयामार्फत विविध संवर्गाच्या नवीन वाहन परवान्याची तसेच, कालबाह्य झालेल्या नूतनीकरणाची चाचणी येथे होणार आहे.
त्या संदर्भात उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार मोटारी (खासगी व परिवहन), जड वाहने या चाचण्या आयडीटीआरमध्ये होणार आहेत. तर, दुचाकी परवानाचा चाचणी या कार्यालयाच्या इमारतीच्या बाजूच्या मोकळ्या मैदानात होतील. त्याचप्रमाणे तीनचाकी व इतर सर्व वाहनांची चाचणी ही ट्राफीक पार्क येथे होणार असल्याची माहिती मिळाली आहे.