- दिवसभरात शहरातील 195, शहराबाहेरील 13 जणांना लागण
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज अडीच महिन्यांनंतर पहिल्यांदा रुग्णवाढ दोनशेपेक्षा कमी झाली आहे. आज शहरातील 195 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर शहराबाहेरील 13 जणांनाही लागण झाली आहे. शहरातील एकूण रुग्णसंख्या 85 हजार 518 इतकी झाली आहे.
रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 195 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 13 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील चार व शहराबाहेरील तीन रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत शहरात 2304 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 356 रुग्णांचाही समावेश आहे.
रविवारी दिवसभरात शहरात सात रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील सांगवी, चिंचवड, चिखली, भोसरी येथील 4 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील कोऱ्हाडे, रेलगाव व खेड येथील तीन जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 263 रुग्णांना घरी सोडण्यात आले.
आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या 81,370 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 1704 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1144 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.