लंडन – ब्रिटनमधील आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एकहाती लक्षावधी पौंडांची मदत उभी करणाऱ्या कॅप्टन टॉम मूर यांना अलिकडेच अखेरचा निरोप देण्यात आला. कॅप्टन मूर यांच्या अंत्यविधीच्यावेळी दुसऱ्या महायुद्धातील लढाऊ विमानांनी मानवंदना दिली. कॅप्टन मूर यांचे 2 फेब्रुवारी रोजी वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले.
कोविडचा संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. करोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी निकटच्या 8 नातेवाईकांशिवाय अन्य कोणीही उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र ब्रिटनच्या सैन्य दलातील सैनिकांनीच कॅप्टन मूर यांचे पार्थिव ठेवलेली शवपेटी आपल्या खांद्यावर उचलून दफनभूमीपर्यंत नेले. त्यानंतर समारंभपूर्वक त्यांना लष्करी मानवंदना देण्यात आली. ब्रिटनमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे कॅप्टन मूर यांच्या कुटुंबीयांनीच सर्व स्नेह्यांना या अंत्यविधीमध्ये सहभागी न होता घरीच थांबण्याचे आवाहन केले होते. कॅप्टन मूर यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध गायक मायकेल बबल यांनी गायलेले “स्माईल’ या गाण्याचे रेकॉर्डिंग यावेळी लावन्यात आले होते.
कॅप्टनमूर यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारत, म्यानमार (तत्कालिन बर्मा) आणि सुमात्रामध्ये लष्करी सेवा केली होती. कॅप्टन मूर यांनी ब्रिटनच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी तब्बल 33 दशलक्ष पौंड (46 दशलक्ष डॉलर) इतका प्रचंड मदत निधी उभारला होता. या कामाला त्यांनी आपल्याच घराच्या मागच्या अंगणात 100 पावले चालून सुरुवात केली. याउपक्रमातून त्यांनी 1000 पौंड जमा केले होते. मात्र त्यांच्या या उपक्रमाला त्यांच्या 100 व्या वाढदिवसापर्यंत त्यांनी सुरू ठेवले. त्यांचा उपक्रम अल्पावधीत अनेकांना समजला. त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देत शेकडो जणांनी या उपक्रमाद्वारे आर्थिक योगदान देऊन ब्रिटनच्या आरोग्य विभागाला मोठा आर्थिक हातभार लावला. करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान प्रचंड आर्थिक मदत उभी राहिली.
“उद्याचा दिवस चांगला असेल. हे लक्षात ठेवा.’ हा सकारात्मक संदेश त्यांनी दिला ब्रिटनमध्ये पसरलेल्या साथीच्या काळात हा सकारात्मक संदेशही वाऱ्यासारखा पसरला. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी खऱ्या अर्थाने एक नायक म्हणून त्याचे वर्णन केले. कॅप्टन मूर यांच्या योगदानाची दखल घेऊन महाराणी एलिझाबेथ यांनी जुलै महिन्यात विंडसर राजवाड्यात त्यांचा गौरवही केला होता.